Sunday 12 July 2020

वैदेही, Conversation आणि आकाशात उंच उडणारी घार!!

टीव्ही बंद करून थेट गच्चीवर गेलो. सध्याच्या COVID-19 रिलेटेड बातम्या तर मन खिन्न करून टाकतात. एखाददिवस आपलाही नंबर त्या वाढणाऱ्या संख्येत येईल कि काय असं हि वाटून जातं...!! पण बाहेरचं वातावरण बातम्यांना समपरकच आहे म्हणा!

संध्याकाळची वेळ, आणि इतर वेळी गर्दीने गजबजलेले रस्ते मात्र सुन्न पडलेयत, एखाद्याच कुठल्यातरी दुकानात मोजक्याच लोकांची वर्दळ दिसतेय.

वर निळेभोर आभाळ आणि खाली दूर-दूर पर्यंत पसरलेले निर्जन रस्ते आणि त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पार्क केलेल्या गाड्याच्या रांगा. त्यात आणखी  भर  म्हणून चौकात-चौकात पोलिसांचे थवे म्हणजे एकदिवसीय 'भारत बंद' ची आठवण करून देतात...

सुरुवातीला सगळं कसं गमतीदार वाटत होतं. वर्क फॉर्म होम, सुट्टीच-सुट्टी, सारी मौजमजाच!! पण हळूहळू त्याच मौजेचं रूपांतर चिंतेत बदलत गेलं. येणाऱ्या काळात होणाऱ्या 'बंद' चा परिणाम, बऱ्याच लोकांचे गेले असलेले  जॉब, आर्थिक ओढाताण आणि झपाट्यानं बदलती जीवनशैली...

मध्येच कुठेतरी आकाशात उंच उडणारी घार लक्ष केंद्रित करत होती. मनात विचार आला की अशा कित्तेक घारी COVID-19 पूर्वी आपली मोठ्ठाली स्वप्न घेऊन उडण्याच्या तय्यारीत होत्या, कित्तेक कोलमडून गेल्या असणार...

विचार आला, खरंच आकाशात उंच उडणाऱ्या त्या घारीला जमिनीवर कोसळण्याची भीती वाटत नसेल...??

इतक्यात पाठीवर एक थाप पडली...


"कुठल्या विचारात आहेस इतका...?" - वैदेहीने विचारलं.

"त्या उंच उडणाऱ्या घारीचा विचार करतोय, भीती नसेल का गं वाटत तिला जमिनीवर कोसळण्याची..?? - मी म्हंटल.

"काय गंमत आहे ना वैदेही, माणूस आयुष्यभर आपल्या गरजा भागवण्यासाठी, आपली जीवनशैली राखण्यासाठी किती धावपळ करतो ना..? किती अडजस्टमेंट्स आणि किती काही... कधी-कधीतर प्रश्न फक्त पैशांपुरताच मर्यादित नसतो तर पत, प्रतिष्ठा, आणि 'लोक काय बोलतील?' अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यामागे माणसाची किती धावपळ होते ना..?"

"बरं गरजा कमी केल्या तरी एक शुल्लक जीवन जगत असल्याची खंत मनात येऊन जाते, वाटतं आयुष्य एकदाच मिळतं, थोडी मौज-मस्ती पण करावी माणसाने; पण रोजच्या या नसंपणाऱ्या धावपळीत आणि या धावपळीत आपण मागे राहिलो तर सर्व स्वप्नांची होणारी हेळसांड या विचाराने मन पार खिन्न होऊन जातं."

कदाचित वैदेही माझं मघापासून निरीक्षण करत असावी म्ह्णूनच तिने माझा प्रश्न अचूक हेरला...वैदेही खूप विचारवंत आणि कोड्यात विचारलेल्या प्रश्नांची पण अचूक उत्तरं देत असत.

"पण घारीने उंच उडता-उडता जमिनीवर कोसळण्याचा विचार करणं कितपद योग्य आहे..? आणि अशा विचाराने घारीच्या दिशेवर आणि वेगावर त्याचा परिणाम नाही का होणार...?? असं म्हणत ती माझ्या शेजारी येऊन बसली.

माझ्या प्रश्नावर ती बोलतच राहिली...

"त्यापेक्षा मला असं वाटतं कि, उडणाऱ्या घारीने तिच्या दिशेकडे आणि वेगाकडे लक्ष केंद्रित करावं. जमिनीवर अगदीच पडाव लागलंच तर घारीला कधी ना कधी खाली यावंच लागणार होतं. आफ्टर ऑल तिची पिल्लं खाली जमिनीवरच असणार ना...आणि जो पर्यंत घार आसमंतात होती तो पर्यंत तिने दिशेचे मनोरे आणि उंचीची चव ही चाखालीच असणार की नाही...!!!"

"माणूस स्वतःकडून जेवढ्या जास्त अपेक्षा करतो तेवढा जास्त स्ट्रेस्ड होतो. प्रत्येक माणसाची एक मर्यादा आहेच की... हा,  प्रयत्नात मात्र हार मानू नये, घारीने भीतीपोटी आपले पंखच हलवले नाहीत तर ती जमिनीवर कोसळणार हे निश्चितच आहे. राहिला प्रश्न पत, प्रतिष्ठा आणि 'लोक काय म्हणतील' याचा, तर 'अज्ञानातच सुखं असतं' हे लक्षात ठेव. 'पत, प्रतिष्ठा' हे सगळं मानण्याचा भाग झाला... विसरून जा.. अल्टिमेटलि 'शांत झोप' आणि 'आपल्या माणसांची सोबत' हा खरा जगण्याचा दर्जा आहे. आणि 'लोक काय म्हणतील' या प्रश्नामध्ये 'लोक' हे 'लोकच' असतात. विचार फक्त 'आपले काय म्हणतील' याचाच करावा असं मला वाटतं."

वैदेहीने शिकवलेल्या या शहाणपणाने थोडं रिलॅक्स वाटलं. बघता-बघता सूर्य पण अस्ताला चालला होता आकाशातली घारही कुठे तरी नाहीशी झाली. मी आणि वैदेही बराच वेळ असेच त्या निर्जन रस्त्यापलीकडील सूर्यास्त पहात जुन्या आठवणींना उजाळा देत बसलो होतो.


समाप्त


'आभाळसांज'

-मंगेश हरवंदे














Sunday 30 September 2018

कार्य-कर्ता...??

कार्य-कर्ता...??

रवाच वाचण्यात आलं की एक बेस्ट (BEST) वाल्या ड्राइव्हर आणि कंडक्टरला कोण्या एका पार्टीच्या रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला म्हणे... गर्दीच्यारस्त्यात बस रिक्षाला घासून नेली असा रिक्षाचालकाचा त्या बिचाऱ्या वयस्कर बसचालकावरचा आरोप...!

भर रस्त्यात त्या बसचालकावर अर्वाच्य शिव्यांचा पाऊस पाडून रिक्षाचालक थांबला नाही तर चक्क "मी अमुक-अमुक पार्टीचा सामाजिक कार्यकर्ता आहे, थांब आता तुला दाखवतोच मी काय चीज आहे ते." असं म्हणत त्याने थेट त्याच्या पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना बोलावून ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनाही बेदम चोप दिला. त्यात त्या बिचाऱ्या कंडक्टरची काय चूक होती म्हणा! असो...

मूळात विषय मार देण्याचा नव्हे तर 'मार देण्याचा' आहे!! प्रश्नच पडतो की ही इतकी हिम्मत येते तरी कुठून ..? सार्वजनिक वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात बस थांबवुन चोप दिला जातो. हे इतकं सहज-सोपं आहे का...?
सहच-सोपं आहे कारण तुम्ही विशिष्ट पार्टीचे 'कार्य-कर्ते' (?) आहात म्हणून की काय ??

खरं पाहता या सगळ्याची सुरुवात दुसरीकडूनच होते. त्याचं काय आहे ना, आज काल भुकांचे प्रकार खूप वाढलेयत. होय! भूक. पोटाला लागते ती भूक नव्हे, ती भूक तर हल्ली नाहीशीच झालेय. उपाशी कोण झोपतोय आज काल!

इथे भुका वाढल्यात त्या सत्तेच्या, वासनेच्या आणि सगळंच आपलसं करून घेण्याच्या! बाकी भूकांबद्दल बोलू केव्हातरी मात्र आजकाल जी सर्वाधिक वाढत चाललेली भूक म्हणजे 'सत्ता'.

ज्याला-त्याला सत्ता हवेय. ज्याला-त्याला मी म्हणेन तेच होईल असं वाटतंय. आणि सत्तेच्या या हव्यासापोटी नतद्रष्ट लोकांना हाताशी धरून कामं करवून घेणाच्या या टोळकीला आजकाल 'कार्यकर्ता' असं म्हंटल जातं. होय!, शब्द जरा कडू असतील पण ही वस्तुस्थिती आहे!

ही सत्ता मिळवण्यासाठी वेळोवेळी 'जत्रा' भरवल्या जातात, तेच ते मोठ्ठाले बॅनर्स, मोठं-मोठी आश्वासनं, पोकळ सभा, समाजाशी हातापाया पडणं, मोफत वास्तूवाटप, आजकाल तर काय 'पाळवापळवीत' पण मदत करणार म्हणे...!! असो, बरं आता इतकी कामं करायची झाली तर मग गोतावळा पण जमा करावा लागतो. मग तो कसा जमा करणार आणि त्यात कोण सामील होणार याचा शोध घेतला जातो. गल्ली-नुक्कडवर शोध सुरू होतो. मग ५६ इंटरव्ह्यू देऊनही वेळेने समृद्ध असलेली, अर्थात बुध्दीशी कसलाही संबंध नसला तरी चालेल, म्हणूनच वेळेने समृद्ध अशी पावले मोर्चेबांधणीकडे वळली जातात.

अपेक्षा जास्त नाही, ऐरवी मुलगी बघायला जाताना हुंड्यामध्ये काय-काय घेणार याची यादीच तयार असते! पण इथे एकच अपेक्षा, कमी वेळात पैसा, चारचौघात 'वट' (वर्चस्व) आणि 'सामाजिक कार्यकर्ता'
हा 'टॅग' की बस्स..., पठया खुश!!

भल्या-भल्यांना असं बळ येतं की जणू इतिहासच घडवणार की काय...इतरवेळी समाजात कोण्या मुलीच्या अब्रूचे लचके तोडले जात असताना हे लोक अगदी दुसऱ्याच्या हद्दीत फिरकणाऱ्या कुत्र्यासारखे शेपूट आत घालून गप्प बसतात. न जाणे तेव्हा हेच बळ कुठे गेलेलं असतं! 

हीच मंडळी होळी-दिवाळीच्या दिवशी विविध रंगांची उधळण करणार  मात्र एक विशिष्ट असा कोणता रंग म्हंटलत तर चक्क इंद्रधनुष्याला बरबटवून त्यात आपापल्या पार्टीचे रंग शोधणार. अर्थात सगळं कशासाठी तर साहेबाची छोटीशी थाप, वट वैगेरे तर आलीच त्या सोबत. ध्येय एकच, आपापल्या पार्टीच्या साहेबाला फेमस करणं, बाकी 'जत्रेकरू' सांभाळतीलच आपलं-आपलं (...आदल्या दिवशी 'मिठाईच्या पुड्या' पोहोचल्यावर).

अर्थात सगळं कसं एकदम फास्ट सुरू आहे की समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर वाच्यता करायला कुणाकडेच वेळ नाहीये. जो-तो मिळेल ते लुटत फरपटत चालला आहे! असतीलही काही प्रामाणिक समाजप्रेमी मात्र सत्तासंपादनाच्या या पुरात कोलमडले वृक्षच जणू ते!

हा मात्र आता कामं ही जोरदार सुरू आहेतच, जस त्या चोप देणाऱ्या  कार्य-कर्त्यांना पोलिसांनी अटक केली खरी, पण भीती कशाची??
साहेब आहेच की सोडवायला!!!

समाप्त

आभाळसांज

-मंगेश मिलिंद हरवंदे

Saturday 29 September 2018

आठवणीतलं फूल!


आठवणीतलं फूल!


कॉलेजचे दिवस असतातच सोनेरी म्हणण्यासारखे पण त्याची जाणीव कॉलेज संपल्यांनंतर होते. 

सिनियर कॉलेज म्हणजे कधी कळत तर कधी नकळत प्रेम तर आलंच!! कॉलेजला जाऊन पठ्या प्रेमात नाही पडला तर पठ्याच कसला तो..!! जणू काही प्रेमात नपडण्याला काही ऑपशनच नसतो. अर्थात साधारणपणे संपूर्ण आयुष्यातली ७० ते ७५% 'हिरवळ' ही, कॉलेजच्या दिवसांमध्येच आणि अगदी सगळ्याच ऋतूनमध्ये सभोवताल असते. सो, इतक्या हिरवळीतलं एखादं 'फुल' आपल्या मनातल्या गार्डनमध्ये नक्कीच घर करतं!! हा,आता त्या फुलांचे  वेग-वेगळे प्रकार आणि त्या-त्या प्रकारावरून त्यांच्या वेग-वेगळ्या व्याख्यापण पडतात असो त्या व्याख्यांवर आपण न बोललेलंच बरं!!

इथे तुमची प्रेयसी कितीही चांगली, कितीही सोज्वळ असली तरी आपले मित्र तिचा उल्लेख 'आयटम' असाच करणार, त्यात ती चुकून तुमच्या ग्रुपच्या समोरून जात असेल तर विचारायलाच नको! इतरवेळी तुमची आठवण न काढणारे मित्रपण तुम्ही समोर असतानासुद्धा मोठ्यांदा हाक मारणार "..... काय बरा आहेस ना..?" आणि आपली नजर तिच्याकडे...

कधी-कधी ती कॅन्टीनमध्ये असेल तर बर्थडे नसतानासुद्धा तुमचा बर्थडे महिन्यातून किमान दोनदा सेलिब्रेट केला जातो. तिलासुद्धा प्रश्न पडत असावा हा जन्माला तरी कितींदा आला... 

बरं पहिलं-वहिलं प्रेम असल्याने तिच्याशी बोलण्याची आणि योगा-योगाने भेट झाली हे भासवण्याची प्रत्येकाची वेग-वेगळी स्टाईल असते. त्यात तुम्ही आणि ती जर का वेग-वेगळ्या फिल्डचे स्टुडंट असाल तर मात्र जरा जास्तच धावपळ करावी लागते. कारण तिचं लेक्चर, तिचे सब्जेक्टस आणि क्लासेसही वेग-वेगळे असतात सो, योगा-योग जुळवून आणण्याचं काम थोडं कठीण होऊन जातं! मात्र ती तुमच्याच फिल्डची असल्यास अर्धेप्रयत्नतर तिथेच संपतात. एक्साम्स जवळ आल्यावर आपल्याकडे नोट्स असतानासुद्धा मुद्दाम तिच्याकडे नोट्स मागण्याचे निर्धार मनात येतात मात्र ती प्रत्यक्षात समोर आल्यावर आपली फूस्स्स$$$ झालेली असते. 

शांततेची सवय नसतानापण फक्त ती आहे म्हणून लायब्ररीत कसलंतरी पुस्तक चाललं जातं. मग बऱ्याच वेळा ते पुस्तकपण नेमकं उलटं पकडलेलं असतं! ते पाहून तिची मैत्रीण मात्र आपण अनपढ असल्यासारखी आपल्याकडे बघते...काही वेळा तर अगदी लेक्चर सुरु होता-होताच क्लासच्या खिडकीतून ती कुठेतरी लांब दिसते म्हणून तिला पाहण्यासाठी लेक्चर हॉलच्या मागच्या डोअरने पळण्याचा प्रयत्न केला जातो. इतक्यात लेक्चरर समोर उभा ठाकतो!! आणि लेक्चरला येऊनसुद्धा पळून जाताना पाहून रागाने ID कार्ड जप्त करतो. मग त्याच्याशी कसातरी समझोता करत ID कार्ड परत मिळवलं जातं. इतकं सगळं झाल्यावरही बाहेर आल्यावर मात्र ती तिथून गायब झालेली असते. 

दिवस वाऱ्यासारखे भुर्रकन उडून जात असतात एक्सामपण लागते. एक्सामच्यावेळीसुद्धा स्वतःपेक्षा तिचा क्लास नंबर आवर्जून पहिला जातो. अगदी Answer paper वाटत असतानापण तिच्या क्लास जवळून फेरफटका मारला जातो...कदाचित काहीतरी विसरून ती बाहेर येईल आणि तिला पाहता येईल हा ओव्हरकॉन्फिडेन्स मनात असतो. आणि यासाऱ्या गडबडीत स्वतःच ID कार्ड कुठेतरी हरवलेलं असतं...आणि एक्सामिनर पुन्हा एकदा क्लास बाहेर काढतो. मात्र चेहऱ्यावर तेच ते नेहमीचं स्मितहास्य असतं. कारण प्रेम हे सच असतं !!!
 





समाप्त 

आभाळसांज 

-मंगेश हरवंदे    











Monday 17 September 2018

हॉल्ट स्टेशन: [Part 3]


पृथ्वीवर अचानक ढग गडगडून विजा जशा चमकतात आणि अधून-मधून लक्ख प्रकाश जसा पडतो तसा लख्ख प्रकाश दूरपर्यंत गेलेल्या त्यापायऱ्या-पायर्यांच्या रस्त्यावर पडत होता. त्याच रस्त्यावरनं अचानक मंद-मंद प्रकाशातून एक विक्राळ प्राणी मोठ्या आवेगाने दौडताना उदयनेे पाहिला. उदयला आता इतकीशीहि भीती उरली नव्हती. ते म्हणतात ना 'मेलेलं कोंबडं आगीला भित नसतं...' तशीच काहीशी अवस्था उदयची झाली होती. पाहता-पाहता तो विक्राळ प्राणी म्हणजे एक अवाढव्य रेडा आणि त्यावर बसून येणारा तो 'यम' उदयने उभ्या आयुष्यत, आतापर्यंत पहिला नव्हता. उष्ण-वर्ण, तापट भाव, तीक्ष्ण नजर आणि सभोवताल भस्मसात होईल की काय असं तेज एका विशाल रेड्यावर बसून वेगाने उदयच्या दिशेने पळत होतं.

समोरा-समोर झाल्यावर नक्की नमसकार करावा कि इतरवेळी मीटिंगला शेकहॅण्ड करतात तसं औपचारिक स्मितहास्य करावं हे उदयला समजत नव्हतं. शेवटी निर्विकार होऊन पुढच्या प्रक्रियेची वाट पाहावं असं उदयने ठरवलं..!!

'चित्रगुप्ताने' यमाकडे आदराने पाहून 'महाराज' असं म्हणून वंदन केलं. उदयसाठी हे सगळं कसं एक मूव्ही सारखं चाललं होतं. मुळातच ४० वर्ष TV, मूव्ही याची आवड बाळगून मेल्यानंतरपण १४-१५ वर्ष प्रत्यक्ष मूव्हीमध्येच काम करण्यासारखं वातावरण झेलल्या नंतर नकळतच उदय हे सगळं एका नव्याच curiosity ने पाहत होता आणि एकंदरीत हे सगळं कोण्या फिल्म डायरेक्टर ने डायरेक्ट केलं नसून चक्क प्रत्यक्षात आहे याच नवल उदयला वाटत असावं...!

पुढे 'चित्रगुप्ताने' उदयच्या कर्माची कहाणी वाचण्यास सुरुवात केली, अगदी त्याच्या उदयपूर्वीच्या जन्मापासनं, त्यांच्यानुसार उदय हा मागच्या जन्मी एका गायीचं वासरू असून कुठल्यातरी मंदिराबाहेर लोक त्याला चारा घालत असत वैगेरे- वैगेरे...
यानंतर तो मनुष्य जन्मात येऊन उदय बनला, त्याचा जन्म, बालपण या सगळ्या कहाण्यांना सुरुवात झाली. चित्रगुप्त उदयच्या अख्या आयुष्याचा पाढा वाचत होते तसा उदय त्याच्या त्या-त्या आठवणीत जाऊन त्या आठवणींचा अनुभव घेत होता. त्याच्या शाळेतल्या गोष्टी>> आठवीत पास होऊन नववीत गेल्याचा आनंद...ते वाटलेले पेढे... कॉलेजचा पहिला दिवस... मृण्मयीपूर्वींची लफडी... मृण्मयीची भेट लग्न आणि मृत्यू दरम्यान केलेली सगळी कर्म...अगदी सरकारी खात्यात लागलेली नोकरी आणि घेतलेली पहिली लाच वैगेरे- वैगेरे
सर्व पडताळणी अंती निर्णय घेण्याची वेळ येताच उदयची उत्कंठता शिगेला पोहोचली कारण अंतिम निर्णय हा 'यम' देणार होते.

...आणि यमाचा आवाज- "उदया तुझा एकंदरीत जीवनप्रवास पाहता तू फारशी कारस्थानं रचली नसलीस तरी कोणाचं उदारहाताने स्वागतही केलेलं नाहीयेस, दान-धर्म करताना देखील तुझ्या मनात त्यातून मिळणारं समाधान यावरच तुझं मन केंद्रित केलस. मुद्दामहून कोणाला दुखावलं नसलस तरी स्वतःच्या पदाचा वापर करून लाच घेण्यासारखी स्वार्थी कामं केलीस. सतत धन आणि उच्चपदामागे राहून ते सगळं मिळवलंस खरं पण त्यासाठी खास कष्ट केले नाहीस, स्वतःअशी काही अंगमेहनत तू कधीच केली नाहीस....
तर या सारांशावरून,चित्रगुप्ता काय जन्म ठरतात याचे..?"


अंतिम निर्णयाच्या आतुरतेने टवकारले उदयचे कान यमाचे शब्द-नि-शब्द अगदी बारकाईने टिपत होते. उदयला खोलवर कुठेतरी आनंदही होत होता कि आपण जे मिळवायचं होतं ते मिळवलच, पण  त्यासाठी कोणाला फारसं काही दुखावलं नसून दान-धर्म पण केली आहेत मग ती भले फळाची अपेक्षा बाळगून केलेली असेनात की...!! अगदी मेलेला माणूससुद्धा किती Optimist असू शकतो याचं मेल्यांनतरच जिवंत उदाहरण म्हणजे उदयच होता..!!

यमाच्या प्रश्नावर खोल विचार करून चित्रगुप्ताने दोन जन्म सुचविले >> 'गर्दभ किंवा पिपीलिका'
उदयला हे दोन नक्की काय आहेत हे लक्षात आल्याने -राहून त्याने विचारणा केली>> "व्हाट्स धिस पिपीलिका अँड गर्दभ??"

यावर 'गाढव' किंवा 'मुंगी' यापैकी एका जन्मात आपण जाणार याच उदयला न्यात झालं.

यमाचा आवाज>> "एकंदरीत उदयने केलेल्या कर्मांवरून त्याच्या बुद्धी विषयीची शंका माझ्या मनात नाही, त्यामुळे या दोन्ही जन्मात त्याला कष्ट आणि धावपळ करावीच लागणार असून 'पिपीलिका' हा उदयचा पुढचा जन्म असेल हे मी जाहीर करतो." असं म्हणून यमाची पाठमोरी आकृती उदयला दिसली.


सो, फायनली उदय मुंगीच्या जन्मात जाणार होता आणि त्या प्रक्रियेला सुरुवात होणार होती. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे पूर्वीच्या जन्माची आणि 'होल्टस्टेशन' वरील स्मुर्ती नाहीशा करणे. सो, स्मुर्ती नाहीशी करण्याची प्रक्रिया चालू असतानाच, तो प्रवेशद्वार जिथनं उदयने आत प्रवेश केला होता त्या प्रवेशद्वाराशी काहीतरी गदारोळ चाललाय अशी खबर चित्रगुप्ताकडे आली. तस समजताच चित्रगुप्त नक्की कसला गदारोळ आणि तो थांबवण्यासाठी त्या दिशेने निघून गेले. ते परतल्याननंतर उदयला समजलं कि कोणीतरी एक मोठा नेता तिथे आला असून (मृत्यूनंतर) तो अजूनसुद्धां इलेक्शनचा प्रचार करत होता. उदयला त्या नेत्याच्या Optimistपणाची कीव वाटत होती...

सो, सर्व प्रक्रिया पूर्णझाल्यावर आता उदय 'मुंगी' या त्याच्या नवीन जन्मात जाण्यास सज्य होता. अर्थात सद्यस्तिथीत तो बेशुद्ध अवस्थेत होता मात्र लवकरच त्याचा जन्म थेट मुंगीच्या घरात म्हणजेच कोणत्यातरी वारुळात होणार होता...!!


समाप्त

आभाळसांज


-मंगेश मिलिंद हरवंदे

Also Read "देव तारी त्याला कोण..?"