Sunday 12 July 2020

वैदेही, Conversation आणि आकाशात उंच उडणारी घार!!

टीव्ही बंद करून थेट गच्चीवर गेलो. सध्याच्या COVID-19 रिलेटेड बातम्या तर मन खिन्न करून टाकतात. एखाददिवस आपलाही नंबर त्या वाढणाऱ्या संख्येत येईल कि काय असं हि वाटून जातं...!! पण बाहेरचं वातावरण बातम्यांना समपरकच आहे म्हणा!

संध्याकाळची वेळ, आणि इतर वेळी गर्दीने गजबजलेले रस्ते मात्र सुन्न पडलेयत, एखाद्याच कुठल्यातरी दुकानात मोजक्याच लोकांची वर्दळ दिसतेय.

वर निळेभोर आभाळ आणि खाली दूर-दूर पर्यंत पसरलेले निर्जन रस्ते आणि त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पार्क केलेल्या गाड्याच्या रांगा. त्यात आणखी  भर  म्हणून चौकात-चौकात पोलिसांचे थवे म्हणजे एकदिवसीय 'भारत बंद' ची आठवण करून देतात...

सुरुवातीला सगळं कसं गमतीदार वाटत होतं. वर्क फॉर्म होम, सुट्टीच-सुट्टी, सारी मौजमजाच!! पण हळूहळू त्याच मौजेचं रूपांतर चिंतेत बदलत गेलं. येणाऱ्या काळात होणाऱ्या 'बंद' चा परिणाम, बऱ्याच लोकांचे गेले असलेले  जॉब, आर्थिक ओढाताण आणि झपाट्यानं बदलती जीवनशैली...

मध्येच कुठेतरी आकाशात उंच उडणारी घार लक्ष केंद्रित करत होती. मनात विचार आला की अशा कित्तेक घारी COVID-19 पूर्वी आपली मोठ्ठाली स्वप्न घेऊन उडण्याच्या तय्यारीत होत्या, कित्तेक कोलमडून गेल्या असणार...

विचार आला, खरंच आकाशात उंच उडणाऱ्या त्या घारीला जमिनीवर कोसळण्याची भीती वाटत नसेल...??

इतक्यात पाठीवर एक थाप पडली...


"कुठल्या विचारात आहेस इतका...?" - वैदेहीने विचारलं.

"त्या उंच उडणाऱ्या घारीचा विचार करतोय, भीती नसेल का गं वाटत तिला जमिनीवर कोसळण्याची..?? - मी म्हंटल.

"काय गंमत आहे ना वैदेही, माणूस आयुष्यभर आपल्या गरजा भागवण्यासाठी, आपली जीवनशैली राखण्यासाठी किती धावपळ करतो ना..? किती अडजस्टमेंट्स आणि किती काही... कधी-कधीतर प्रश्न फक्त पैशांपुरताच मर्यादित नसतो तर पत, प्रतिष्ठा, आणि 'लोक काय बोलतील?' अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यामागे माणसाची किती धावपळ होते ना..?"

"बरं गरजा कमी केल्या तरी एक शुल्लक जीवन जगत असल्याची खंत मनात येऊन जाते, वाटतं आयुष्य एकदाच मिळतं, थोडी मौज-मस्ती पण करावी माणसाने; पण रोजच्या या नसंपणाऱ्या धावपळीत आणि या धावपळीत आपण मागे राहिलो तर सर्व स्वप्नांची होणारी हेळसांड या विचाराने मन पार खिन्न होऊन जातं."

कदाचित वैदेही माझं मघापासून निरीक्षण करत असावी म्ह्णूनच तिने माझा प्रश्न अचूक हेरला...वैदेही खूप विचारवंत आणि कोड्यात विचारलेल्या प्रश्नांची पण अचूक उत्तरं देत असत.

"पण घारीने उंच उडता-उडता जमिनीवर कोसळण्याचा विचार करणं कितपद योग्य आहे..? आणि अशा विचाराने घारीच्या दिशेवर आणि वेगावर त्याचा परिणाम नाही का होणार...?? असं म्हणत ती माझ्या शेजारी येऊन बसली.

माझ्या प्रश्नावर ती बोलतच राहिली...

"त्यापेक्षा मला असं वाटतं कि, उडणाऱ्या घारीने तिच्या दिशेकडे आणि वेगाकडे लक्ष केंद्रित करावं. जमिनीवर अगदीच पडाव लागलंच तर घारीला कधी ना कधी खाली यावंच लागणार होतं. आफ्टर ऑल तिची पिल्लं खाली जमिनीवरच असणार ना...आणि जो पर्यंत घार आसमंतात होती तो पर्यंत तिने दिशेचे मनोरे आणि उंचीची चव ही चाखालीच असणार की नाही...!!!"

"माणूस स्वतःकडून जेवढ्या जास्त अपेक्षा करतो तेवढा जास्त स्ट्रेस्ड होतो. प्रत्येक माणसाची एक मर्यादा आहेच की... हा,  प्रयत्नात मात्र हार मानू नये, घारीने भीतीपोटी आपले पंखच हलवले नाहीत तर ती जमिनीवर कोसळणार हे निश्चितच आहे. राहिला प्रश्न पत, प्रतिष्ठा आणि 'लोक काय म्हणतील' याचा, तर 'अज्ञानातच सुखं असतं' हे लक्षात ठेव. 'पत, प्रतिष्ठा' हे सगळं मानण्याचा भाग झाला... विसरून जा.. अल्टिमेटलि 'शांत झोप' आणि 'आपल्या माणसांची सोबत' हा खरा जगण्याचा दर्जा आहे. आणि 'लोक काय म्हणतील' या प्रश्नामध्ये 'लोक' हे 'लोकच' असतात. विचार फक्त 'आपले काय म्हणतील' याचाच करावा असं मला वाटतं."

वैदेहीने शिकवलेल्या या शहाणपणाने थोडं रिलॅक्स वाटलं. बघता-बघता सूर्य पण अस्ताला चालला होता आकाशातली घारही कुठे तरी नाहीशी झाली. मी आणि वैदेही बराच वेळ असेच त्या निर्जन रस्त्यापलीकडील सूर्यास्त पहात जुन्या आठवणींना उजाळा देत बसलो होतो.


समाप्त


'आभाळसांज'

-मंगेश हरवंदे














No comments:

Post a Comment