Sunday 30 September 2018

कार्य-कर्ता...??

कार्य-कर्ता...??

रवाच वाचण्यात आलं की एक बेस्ट (BEST) वाल्या ड्राइव्हर आणि कंडक्टरला कोण्या एका पार्टीच्या रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला म्हणे... गर्दीच्यारस्त्यात बस रिक्षाला घासून नेली असा रिक्षाचालकाचा त्या बिचाऱ्या वयस्कर बसचालकावरचा आरोप...!

भर रस्त्यात त्या बसचालकावर अर्वाच्य शिव्यांचा पाऊस पाडून रिक्षाचालक थांबला नाही तर चक्क "मी अमुक-अमुक पार्टीचा सामाजिक कार्यकर्ता आहे, थांब आता तुला दाखवतोच मी काय चीज आहे ते." असं म्हणत त्याने थेट त्याच्या पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना बोलावून ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनाही बेदम चोप दिला. त्यात त्या बिचाऱ्या कंडक्टरची काय चूक होती म्हणा! असो...

मूळात विषय मार देण्याचा नव्हे तर 'मार देण्याचा' आहे!! प्रश्नच पडतो की ही इतकी हिम्मत येते तरी कुठून ..? सार्वजनिक वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात बस थांबवुन चोप दिला जातो. हे इतकं सहज-सोपं आहे का...?
सहच-सोपं आहे कारण तुम्ही विशिष्ट पार्टीचे 'कार्य-कर्ते' (?) आहात म्हणून की काय ??

खरं पाहता या सगळ्याची सुरुवात दुसरीकडूनच होते. त्याचं काय आहे ना, आज काल भुकांचे प्रकार खूप वाढलेयत. होय! भूक. पोटाला लागते ती भूक नव्हे, ती भूक तर हल्ली नाहीशीच झालेय. उपाशी कोण झोपतोय आज काल!

इथे भुका वाढल्यात त्या सत्तेच्या, वासनेच्या आणि सगळंच आपलसं करून घेण्याच्या! बाकी भूकांबद्दल बोलू केव्हातरी मात्र आजकाल जी सर्वाधिक वाढत चाललेली भूक म्हणजे 'सत्ता'.

ज्याला-त्याला सत्ता हवेय. ज्याला-त्याला मी म्हणेन तेच होईल असं वाटतंय. आणि सत्तेच्या या हव्यासापोटी नतद्रष्ट लोकांना हाताशी धरून कामं करवून घेणाच्या या टोळकीला आजकाल 'कार्यकर्ता' असं म्हंटल जातं. होय!, शब्द जरा कडू असतील पण ही वस्तुस्थिती आहे!

ही सत्ता मिळवण्यासाठी वेळोवेळी 'जत्रा' भरवल्या जातात, तेच ते मोठ्ठाले बॅनर्स, मोठं-मोठी आश्वासनं, पोकळ सभा, समाजाशी हातापाया पडणं, मोफत वास्तूवाटप, आजकाल तर काय 'पाळवापळवीत' पण मदत करणार म्हणे...!! असो, बरं आता इतकी कामं करायची झाली तर मग गोतावळा पण जमा करावा लागतो. मग तो कसा जमा करणार आणि त्यात कोण सामील होणार याचा शोध घेतला जातो. गल्ली-नुक्कडवर शोध सुरू होतो. मग ५६ इंटरव्ह्यू देऊनही वेळेने समृद्ध असलेली, अर्थात बुध्दीशी कसलाही संबंध नसला तरी चालेल, म्हणूनच वेळेने समृद्ध अशी पावले मोर्चेबांधणीकडे वळली जातात.

अपेक्षा जास्त नाही, ऐरवी मुलगी बघायला जाताना हुंड्यामध्ये काय-काय घेणार याची यादीच तयार असते! पण इथे एकच अपेक्षा, कमी वेळात पैसा, चारचौघात 'वट' (वर्चस्व) आणि 'सामाजिक कार्यकर्ता'
हा 'टॅग' की बस्स..., पठया खुश!!

भल्या-भल्यांना असं बळ येतं की जणू इतिहासच घडवणार की काय...इतरवेळी समाजात कोण्या मुलीच्या अब्रूचे लचके तोडले जात असताना हे लोक अगदी दुसऱ्याच्या हद्दीत फिरकणाऱ्या कुत्र्यासारखे शेपूट आत घालून गप्प बसतात. न जाणे तेव्हा हेच बळ कुठे गेलेलं असतं! 

हीच मंडळी होळी-दिवाळीच्या दिवशी विविध रंगांची उधळण करणार  मात्र एक विशिष्ट असा कोणता रंग म्हंटलत तर चक्क इंद्रधनुष्याला बरबटवून त्यात आपापल्या पार्टीचे रंग शोधणार. अर्थात सगळं कशासाठी तर साहेबाची छोटीशी थाप, वट वैगेरे तर आलीच त्या सोबत. ध्येय एकच, आपापल्या पार्टीच्या साहेबाला फेमस करणं, बाकी 'जत्रेकरू' सांभाळतीलच आपलं-आपलं (...आदल्या दिवशी 'मिठाईच्या पुड्या' पोहोचल्यावर).

अर्थात सगळं कसं एकदम फास्ट सुरू आहे की समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर वाच्यता करायला कुणाकडेच वेळ नाहीये. जो-तो मिळेल ते लुटत फरपटत चालला आहे! असतीलही काही प्रामाणिक समाजप्रेमी मात्र सत्तासंपादनाच्या या पुरात कोलमडले वृक्षच जणू ते!

हा मात्र आता कामं ही जोरदार सुरू आहेतच, जस त्या चोप देणाऱ्या  कार्य-कर्त्यांना पोलिसांनी अटक केली खरी, पण भीती कशाची??
साहेब आहेच की सोडवायला!!!

समाप्त

आभाळसांज

-मंगेश मिलिंद हरवंदे

No comments:

Post a Comment