Saturday 29 September 2018

आठवणीतलं फूल!


आठवणीतलं फूल!


कॉलेजचे दिवस असतातच सोनेरी म्हणण्यासारखे पण त्याची जाणीव कॉलेज संपल्यांनंतर होते. 

सिनियर कॉलेज म्हणजे कधी कळत तर कधी नकळत प्रेम तर आलंच!! कॉलेजला जाऊन पठ्या प्रेमात नाही पडला तर पठ्याच कसला तो..!! जणू काही प्रेमात नपडण्याला काही ऑपशनच नसतो. अर्थात साधारणपणे संपूर्ण आयुष्यातली ७० ते ७५% 'हिरवळ' ही, कॉलेजच्या दिवसांमध्येच आणि अगदी सगळ्याच ऋतूनमध्ये सभोवताल असते. सो, इतक्या हिरवळीतलं एखादं 'फुल' आपल्या मनातल्या गार्डनमध्ये नक्कीच घर करतं!! हा,आता त्या फुलांचे  वेग-वेगळे प्रकार आणि त्या-त्या प्रकारावरून त्यांच्या वेग-वेगळ्या व्याख्यापण पडतात असो त्या व्याख्यांवर आपण न बोललेलंच बरं!!

इथे तुमची प्रेयसी कितीही चांगली, कितीही सोज्वळ असली तरी आपले मित्र तिचा उल्लेख 'आयटम' असाच करणार, त्यात ती चुकून तुमच्या ग्रुपच्या समोरून जात असेल तर विचारायलाच नको! इतरवेळी तुमची आठवण न काढणारे मित्रपण तुम्ही समोर असतानासुद्धा मोठ्यांदा हाक मारणार "..... काय बरा आहेस ना..?" आणि आपली नजर तिच्याकडे...

कधी-कधी ती कॅन्टीनमध्ये असेल तर बर्थडे नसतानासुद्धा तुमचा बर्थडे महिन्यातून किमान दोनदा सेलिब्रेट केला जातो. तिलासुद्धा प्रश्न पडत असावा हा जन्माला तरी कितींदा आला... 

बरं पहिलं-वहिलं प्रेम असल्याने तिच्याशी बोलण्याची आणि योगा-योगाने भेट झाली हे भासवण्याची प्रत्येकाची वेग-वेगळी स्टाईल असते. त्यात तुम्ही आणि ती जर का वेग-वेगळ्या फिल्डचे स्टुडंट असाल तर मात्र जरा जास्तच धावपळ करावी लागते. कारण तिचं लेक्चर, तिचे सब्जेक्टस आणि क्लासेसही वेग-वेगळे असतात सो, योगा-योग जुळवून आणण्याचं काम थोडं कठीण होऊन जातं! मात्र ती तुमच्याच फिल्डची असल्यास अर्धेप्रयत्नतर तिथेच संपतात. एक्साम्स जवळ आल्यावर आपल्याकडे नोट्स असतानासुद्धा मुद्दाम तिच्याकडे नोट्स मागण्याचे निर्धार मनात येतात मात्र ती प्रत्यक्षात समोर आल्यावर आपली फूस्स्स$$$ झालेली असते. 

शांततेची सवय नसतानापण फक्त ती आहे म्हणून लायब्ररीत कसलंतरी पुस्तक चाललं जातं. मग बऱ्याच वेळा ते पुस्तकपण नेमकं उलटं पकडलेलं असतं! ते पाहून तिची मैत्रीण मात्र आपण अनपढ असल्यासारखी आपल्याकडे बघते...काही वेळा तर अगदी लेक्चर सुरु होता-होताच क्लासच्या खिडकीतून ती कुठेतरी लांब दिसते म्हणून तिला पाहण्यासाठी लेक्चर हॉलच्या मागच्या डोअरने पळण्याचा प्रयत्न केला जातो. इतक्यात लेक्चरर समोर उभा ठाकतो!! आणि लेक्चरला येऊनसुद्धा पळून जाताना पाहून रागाने ID कार्ड जप्त करतो. मग त्याच्याशी कसातरी समझोता करत ID कार्ड परत मिळवलं जातं. इतकं सगळं झाल्यावरही बाहेर आल्यावर मात्र ती तिथून गायब झालेली असते. 

दिवस वाऱ्यासारखे भुर्रकन उडून जात असतात एक्सामपण लागते. एक्सामच्यावेळीसुद्धा स्वतःपेक्षा तिचा क्लास नंबर आवर्जून पहिला जातो. अगदी Answer paper वाटत असतानापण तिच्या क्लास जवळून फेरफटका मारला जातो...कदाचित काहीतरी विसरून ती बाहेर येईल आणि तिला पाहता येईल हा ओव्हरकॉन्फिडेन्स मनात असतो. आणि यासाऱ्या गडबडीत स्वतःच ID कार्ड कुठेतरी हरवलेलं असतं...आणि एक्सामिनर पुन्हा एकदा क्लास बाहेर काढतो. मात्र चेहऱ्यावर तेच ते नेहमीचं स्मितहास्य असतं. कारण प्रेम हे सच असतं !!!
 





समाप्त 

आभाळसांज 

-मंगेश हरवंदे    











No comments:

Post a Comment