"आभाळसांज"
written by -मंगेश मिलिंद हरवंदे.
Saturday, 14 June 2025
गावची सकाळ आणि जुने मित्र: दमलेल्या मनाला नवा श्वास
Sunday, 12 July 2020
टीव्ही बंद करून थेट गच्चीवर गेलो. सध्याच्या COVID-19 रिलेटेड बातम्या तर मन खिन्न करून टाकतात. एखाददिवस आपलाही नंबर त्या वाढणाऱ्या संख्येत येईल कि काय असं हि वाटून जातं...!! पण बाहेरचं वातावरण बातम्यांना समपरकच आहे म्हणा!
संध्याकाळची वेळ, आणि इतर वेळी गर्दीने गजबजलेले रस्ते मात्र सुन्न पडलेयत, एखाद्याच कुठल्यातरी दुकानात मोजक्याच लोकांची वर्दळ दिसतेय.
वर निळेभोर आभाळ आणि खाली दूर-दूर पर्यंत पसरलेले निर्जन रस्ते आणि त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पार्क केलेल्या गाड्याच्या रांगा. त्यात आणखी भर म्हणून चौकात-चौकात पोलिसांचे थवे म्हणजे एकदिवसीय 'भारत बंद' ची आठवण करून देतात...
सुरुवातीला सगळं कसं गमतीदार वाटत होतं. वर्क फॉर्म होम, सुट्टीच-सुट्टी, सारी मौजमजाच!! पण हळूहळू त्याच मौजेचं रूपांतर चिंतेत बदलत गेलं. येणाऱ्या काळात होणाऱ्या 'बंद' चा परिणाम, बऱ्याच लोकांचे गेले असलेले जॉब, आर्थिक ओढाताण आणि झपाट्यानं बदलती जीवनशैली...
मध्येच कुठेतरी आकाशात उंच उडणारी घार लक्ष केंद्रित करत होती. मनात विचार आला की अशा कित्तेक घारी COVID-19 पूर्वी आपली मोठ्ठाली स्वप्न घेऊन उडण्याच्या तय्यारीत होत्या, कित्तेक कोलमडून गेल्या असणार...
विचार आला, खरंच आकाशात उंच उडणाऱ्या त्या घारीला जमिनीवर कोसळण्याची भीती वाटत नसेल...??
इतक्यात पाठीवर एक थाप पडली...
"कुठल्या विचारात आहेस इतका...?" - वैदेहीने विचारलं.
"त्या उंच उडणाऱ्या घारीचा विचार करतोय, भीती नसेल का गं वाटत तिला जमिनीवर कोसळण्याची..?? - मी म्हंटल.
"काय गंमत आहे ना वैदेही, माणूस आयुष्यभर आपल्या गरजा भागवण्यासाठी, आपली जीवनशैली राखण्यासाठी किती धावपळ करतो ना..? किती अडजस्टमेंट्स आणि किती काही... कधी-कधीतर प्रश्न फक्त पैशांपुरताच मर्यादित नसतो तर पत, प्रतिष्ठा, आणि 'लोक काय बोलतील?' अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यामागे माणसाची किती धावपळ होते ना..?"
"बरं गरजा कमी केल्या तरी एक शुल्लक जीवन जगत असल्याची खंत मनात येऊन जाते, वाटतं आयुष्य एकदाच मिळतं, थोडी मौज-मस्ती पण करावी माणसाने; पण रोजच्या या नसंपणाऱ्या धावपळीत आणि या धावपळीत आपण मागे राहिलो तर सर्व स्वप्नांची होणारी हेळसांड या विचाराने मन पार खिन्न होऊन जातं."
कदाचित वैदेही माझं मघापासून निरीक्षण करत असावी म्ह्णूनच तिने माझा प्रश्न अचूक हेरला...वैदेही खूप विचारवंत आणि कोड्यात विचारलेल्या प्रश्नांची पण अचूक उत्तरं देत असत.
"पण घारीने उंच उडता-उडता जमिनीवर कोसळण्याचा विचार करणं कितपद योग्य आहे..? आणि अशा विचाराने घारीच्या दिशेवर आणि वेगावर त्याचा परिणाम नाही का होणार...?? असं म्हणत ती माझ्या शेजारी येऊन बसली.
माझ्या प्रश्नावर ती बोलतच राहिली...
"त्यापेक्षा मला असं वाटतं कि, उडणाऱ्या घारीने तिच्या दिशेकडे आणि वेगाकडे लक्ष केंद्रित करावं. जमिनीवर अगदीच पडाव लागलंच तर घारीला कधी ना कधी खाली यावंच लागणार होतं. आफ्टर ऑल तिची पिल्लं खाली जमिनीवरच असणार ना...आणि जो पर्यंत घार आसमंतात होती तो पर्यंत तिने दिशेचे मनोरे आणि उंचीची चव ही चाखालीच असणार की नाही...!!!"
"माणूस स्वतःकडून जेवढ्या जास्त अपेक्षा करतो तेवढा जास्त स्ट्रेस्ड होतो. प्रत्येक माणसाची एक मर्यादा आहेच की... हा, प्रयत्नात मात्र हार मानू नये, घारीने भीतीपोटी आपले पंखच हलवले नाहीत तर ती जमिनीवर कोसळणार हे निश्चितच आहे. राहिला प्रश्न पत, प्रतिष्ठा आणि 'लोक काय म्हणतील' याचा, तर 'अज्ञानातच सुखं असतं' हे लक्षात ठेव. 'पत, प्रतिष्ठा' हे सगळं मानण्याचा भाग झाला... विसरून जा.. अल्टिमेटलि 'शांत झोप' आणि 'आपल्या माणसांची सोबत' हा खरा जगण्याचा दर्जा आहे. आणि 'लोक काय म्हणतील' या प्रश्नामध्ये 'लोक' हे 'लोकच' असतात. विचार फक्त 'आपले काय म्हणतील' याचाच करावा असं मला वाटतं."
वैदेहीने शिकवलेल्या या शहाणपणाने थोडं रिलॅक्स वाटलं. बघता-बघता सूर्य पण अस्ताला चालला होता आकाशातली घारही कुठे तरी नाहीशी झाली. मी आणि वैदेही बराच वेळ असेच त्या निर्जन रस्त्यापलीकडील सूर्यास्त पहात जुन्या आठवणींना उजाळा देत बसलो होतो.
समाप्त
'आभाळसांज'
-मंगेश हरवंदे
Sunday, 30 September 2018
कार्य-कर्ता...??
कार्य-कर्ता...??
परवाच वाचण्यात आलं की एक बेस्ट (BEST) वाल्या ड्राइव्हर आणि कंडक्टरला कोण्या एका पार्टीच्या रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला म्हणे... गर्दीच्यारस्त्यात बस रिक्षाला घासून नेली असा रिक्षाचालकाचा त्या बिचाऱ्या वयस्कर बसचालकावरचा आरोप...!
भर रस्त्यात त्या बसचालकावर अर्वाच्य शिव्यांचा पाऊस पाडून रिक्षाचालक थांबला नाही तर चक्क "मी अमुक-अमुक पार्टीचा सामाजिक कार्यकर्ता आहे, थांब आता तुला दाखवतोच मी काय चीज आहे ते." असं म्हणत त्याने थेट त्याच्या पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना बोलावून ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनाही बेदम चोप दिला. त्यात त्या बिचाऱ्या कंडक्टरची काय चूक होती म्हणा! असो...
मूळात विषय मार देण्याचा नव्हे तर 'मार देण्याचा' आहे!! प्रश्नच पडतो की ही इतकी हिम्मत येते तरी कुठून ..? सार्वजनिक वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात बस थांबवुन चोप दिला जातो. हे इतकं सहज-सोपं आहे का...?
सहच-सोपं आहे कारण तुम्ही विशिष्ट पार्टीचे 'कार्य-कर्ते' (?) आहात म्हणून की काय ??
खरं पाहता या सगळ्याची सुरुवात दुसरीकडूनच होते. त्याचं काय आहे ना, आज काल भुकांचे प्रकार खूप वाढलेयत. होय! भूक. पोटाला लागते ती भूक नव्हे, ती भूक तर हल्ली नाहीशीच झालेय. उपाशी कोण झोपतोय आज काल!
इथे भुका वाढल्यात त्या सत्तेच्या, वासनेच्या आणि सगळंच आपलसं करून घेण्याच्या! बाकी भूकांबद्दल बोलू केव्हातरी मात्र आजकाल जी सर्वाधिक वाढत चाललेली भूक म्हणजे 'सत्ता'.
ज्याला-त्याला सत्ता हवेय. ज्याला-त्याला मी म्हणेन तेच होईल असं वाटतंय. आणि सत्तेच्या या हव्यासापोटी नतद्रष्ट लोकांना हाताशी धरून कामं करवून घेणाच्या या टोळकीला आजकाल 'कार्यकर्ता' असं म्हंटल जातं. होय!, शब्द जरा कडू असतील पण ही वस्तुस्थिती आहे!
ही सत्ता मिळवण्यासाठी वेळोवेळी 'जत्रा' भरवल्या जातात, तेच ते मोठ्ठाले बॅनर्स, मोठं-मोठी आश्वासनं, पोकळ सभा, समाजाशी हातापाया पडणं, मोफत वास्तूवाटप, आजकाल तर काय 'पाळवापळवीत' पण मदत करणार म्हणे...!! असो, बरं आता इतकी कामं करायची झाली तर मग गोतावळा पण जमा करावा लागतो. मग तो कसा जमा करणार आणि त्यात कोण सामील होणार याचा शोध घेतला जातो. गल्ली-नुक्कडवर शोध सुरू होतो. मग ५६ इंटरव्ह्यू देऊनही वेळेने समृद्ध असलेली, अर्थात बुध्दीशी कसलाही संबंध नसला तरी चालेल, म्हणूनच वेळेने समृद्ध अशी पावले मोर्चेबांधणीकडे वळली जातात.
अपेक्षा जास्त नाही, ऐरवी मुलगी बघायला जाताना हुंड्यामध्ये काय-काय घेणार याची यादीच तयार असते! पण इथे एकच अपेक्षा, कमी वेळात पैसा, चारचौघात 'वट' (वर्चस्व) आणि 'सामाजिक कार्यकर्ता'
हा 'टॅग' की बस्स..., पठया खुश!!
भल्या-भल्यांना असं बळ येतं की जणू इतिहासच घडवणार की काय...इतरवेळी समाजात कोण्या मुलीच्या अब्रूचे लचके तोडले जात असताना हे लोक अगदी दुसऱ्याच्या हद्दीत फिरकणाऱ्या कुत्र्यासारखे शेपूट आत घालून गप्प बसतात. न जाणे तेव्हा हेच बळ कुठे गेलेलं असतं!
हीच मंडळी होळी-दिवाळीच्या दिवशी विविध रंगांची उधळण करणार मात्र एक विशिष्ट असा कोणता रंग म्हंटलत तर चक्क इंद्रधनुष्याला बरबटवून त्यात आपापल्या पार्टीचे रंग शोधणार. अर्थात सगळं कशासाठी तर साहेबाची छोटीशी थाप, वट वैगेरे तर आलीच त्या सोबत. ध्येय एकच, आपापल्या पार्टीच्या साहेबाला फेमस करणं, बाकी 'जत्रेकरू' सांभाळतीलच आपलं-आपलं (...आदल्या दिवशी 'मिठाईच्या पुड्या' पोहोचल्यावर).
अर्थात सगळं कसं एकदम फास्ट सुरू आहे की समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर वाच्यता करायला कुणाकडेच वेळ नाहीये. जो-तो मिळेल ते लुटत फरपटत चालला आहे! असतीलही काही प्रामाणिक समाजप्रेमी मात्र सत्तासंपादनाच्या या पुरात कोलमडले वृक्षच जणू ते!
हा मात्र आता कामं ही जोरदार सुरू आहेतच, जस त्या चोप देणाऱ्या कार्य-कर्त्यांना पोलिसांनी अटक केली खरी, पण भीती कशाची??
साहेब आहेच की सोडवायला!!!
समाप्त
आभाळसांज
-मंगेश मिलिंद हरवंदे

