Sunday 5 February 2017

देव तारी ,त्याला कोण...??


देव तारी ,त्याला कोण...??


{उगाचचं देवाचं "प्रमोशन आणि मार्केटिंग" करून लोकांचा पाठिंबा आत्मसात केलेल्या भोंदू बाबांच्या संपर्कात आलो असतानाची सुचलेली एक छोटीशी टिपणी...}


दुपारची वेळ असावी, शाळेतली मुले कंटाळली होती. पण मात्र पुढचा तास ऑफ होता त्यामुळे धम्मालच-धम्माल...!!!

मुलं वह्यांची पानं फाडून विमानं बनवत होती, कोणाचं विमान जास्त उंच उडतंय याची पैज लागली होती. दुसरीकडे मुलींचाही गोंधळ काही कमी नव्हता. इथल्या-तिथल्या गोष्टी रंगल्या होत्या.

काही टवाळ मुलं पताक्यांचे धागे तोडत मस्ती करत होती एकंदरीत वातावरणात एकदम कल्लोळ माजला होता. शेजारचे दोन वर्ग सोडूनच हेडमास्टरांचे केबिन होते, दुर्दैवाने हा सारा कल्लोळ त्यांच्या कानापर्यंत पोहोचला, मुळातच स्वभावाने तापट डोक्याचा तो हेडमास्तर थेट त्या वर्गाच्या दिशेने निघाला... 


आता काय मुलांची चांगलीच वाजणार होती... मास्तर वर्गात पाऊल  ठेवल्यावर समोरच दृष्य- एक उंच उडालेलं विमान त्यांच्या डोक्यावरून मुलींच्या घोळक्यात शिरलं, पताक्याच्या तुटलेल्या धाग्याला एक मुलगा आणखी खाली खेचतोय, एक मुलगा तर चक्क गुरुजींच्या खुर्चीवर पाय  ठेऊन निलगिरी पर्वत उचलणाऱ्या हनुमंताची नक्कल करत होता...

मास्तरला समोर पाहताच 'वादळानंतरची शांतता' पसरली, खरं तर वादळ आत्ता येणार होतं. मास्तरची नजर त्या खुर्चीवर पाय ठेऊन हनुमंताची नक्कल करणाऱ्या मुलाकडेच... संतापलेल्या मास्तरांचा तो चेहरा जणू काही त्याला राक्षसा सारखा भासला असावा. घाबरगुंडीने मुलाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले "बाप रे ..!!! देवा आता तूच मला वाचावं." 

देवा ...??  देव.. ?  ...आणि मला प्रश्न पडला कि खरंच आता देव त्या मुलाला मास्तरांकडून मिळणाऱ्या शिक्षेतून वाचवायला येणार का..?? आणि जरी देव आलाच तरी त्या मुलाला वाचवू शकेल का..??
... अर्थात मी नास्तिक वगैरे नाही, मी सुद्धा देवाचं अस्तित्व मानतो-किंबहुना बऱ्याच संकटांना तोंड देण्याची शक्ती देवाने मला दिली असं मी समजतो.  

पण मला पडलेला प्रश्न हा सध्याच्या परिस्थितीला समपर्कच आहे. अगदी ९९% लोकांचा देवावर विश्वास आहे. आपल्याकडे विविध पौर्वात्य मंदिरे पाहायला  मिळतात, लोक मनोभावाने त्या मंदिरातल्या मूर्तींसमोर नतमस्तक होताना दिसतात,

अनेक प्रकारचे नवस केले जातात, ते पूर्ण होतात किंवा पूर्ण होतील अशी लोकांची धारणा सुद्धा असते. पण खरंच कधी आपण असा विचार केला आहे का कि देव नावाची दैवी शक्ती या विश्वात आहे किंवा नाही..??  करणारे करतात असा विचार पण घाबरत-घाबरतच, म्हणजे असा विचार केल्याने खरंच  देव असेल तर तो कोणती मोठी शिक्षा तर नाही ना देणार.. वैगेरे-वैगेरे... 

आज समाजात भर दिवसा बलात्कार, खून, चोरी वैगेरे-वैगेरे सारख्या घटना घडत असतात तेव्हा कुठे असतो देव... अर्थात देव काही स्वतःहून  येऊन हे सगळं थांवणार वैगेरे अशातली गोष्ट नाही, पण तरी म्हणतात ना, देव सगळं पाहतो आहे.  मग खरंच एखाद्या मुलीच्या अब्रूचे लचके तोडत असताना  तो असा कसा पाहूशकतो..?? काय करत असतो तो तेव्हा ..? कि ते फक्त त्या मुलीचे भोग असतात आणि जरी ते तिचे भोग असले जरी ती त्या मुलीला मिळत असलेली शिक्षा असली तरी तो शिक्षा देणारा, तिच्या अब्रूचे लचके तोडणारा 'तो' कोण असतो..? तो पण एक पापच करत असतो ना..?? कि त्याने केलेल्या चांगल्या कर्माची फळं असतात ती..?? काय उत्तर आहे याचं ..??

माणूस जी तीव्र इच्छा प्रकट (will power) करतो हे त्याचं मागणं असतं. आणि त्याच्या या तीव्रतेनेच त्याच मागणं कधी पूर्ण होतं तर कधी नाही होत. 

साधी गोष्टच घ्याना, नैसर्गिक आपत्तीआल्यानंतर जे लोक तडफडत मरतात ते त्यांचे भोग असतात का ..? ती त्यांना मिळालेली शिक्षा असते का..?? आणि जर ते त्यांचे भोग असतील तर ज्या ठिकाणी आपत्ती आली  त्या ठिकाणचे सगळेच लोक पापी होते असं म्हणणं कितपत योग्य ठरेल ..?? त्या आप्पत्तीग्रस्त भागात कित्तेक मंदिरे सुद्धा असतात मग त्याला काय म्हणता येईल..??

मग का नाही दया येत देवाला त्या म्हातारीची, जी दिवसभर उभीराहुन, ज्या वयात नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवायला पाहिजे त्याच अंगाखांद्यावर फाटलेल्या चोळीचे  तुकडे लपेटून सिग्नलवर भीक मागत असते. का नाही येत..??

का एखाद्या प्रामाणिक माणसाला टेबलाखालून "मिठाईची पूडी"  देवू करून  लाचखोर बनवलं जातं ...?? असतो कुठे तेव्हा तो देव..??

मी नास्तिक नाही हे मी पहिलंच स्पष्ट केलंय अर्थात. मी सुद्धा देवाला मानतो, पण विशिष्ठ मर्यादेपर्यंतच.

समुद्रात प्रत्यक्ष उडी मारल्या नंतर देवाचा धाव केल्यावर तो मला नक्की वाचवेल असं म्हणणं कितपत योग्य आहे..?? स्वतः पोहण्याचा प्रयत्न केल्याशिवाय किनारा कसा मिळणार..?? 

.....पुढे त्या खुर्चीवर पाय ठेऊन हनुमंताची नक्कल करणाऱ्या मुलाने मास्तरांचा मार मात्र नक्कीच खाल्ला.. पण देवाचं नाव घेतल्याने कमी मार खाल्ला असेल असं म्हणू शकता तुम्ही हवं तर. .....!!!


समाप्त. 
                                                                                                                    "आभाळसांज"

                                                                                                               -मंगेश मिलिंद हरवंदे 


No comments:

Post a Comment