Tuesday 7 February 2017

हॅपी जर्नी ...


हॅपी जर्नी ...

'रस्ता' या शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं..?? तुम्हाला भटकंतीची आवड असेल किंवा पर्यटनामध्ये रस असेल तर हा शब्द तुम्हाला नक्कीच खूप लांब घेऊन जाईल. मात्र तुम्ही busy life जगत असाल तर हा शब्द तुमच्या फारसा संपर्कात नसेल.... 

सुरुवातीपासूनच भटकंतीची आवड, मात्र नुसती निसर्गरम्य प्रदेशातच नव्हे तर पायदळी तुडवत जाणारी कोणतीही वाट खुणावतेय असं वाटे.

तीन महिन्यांपूर्वीची ती आठवण. अजूनही आठवतो तो रस्ता...दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आज्जी आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन कोकणात गावाकडे निघालो होतो, गावी जायचं म्हंटल्यावर लहान मुलांची तर फारच मौज चालली होती. बरचसं सामान पॅक करून ठेवलं होतं, पण मीच ओरडलो, तीन दिवसांच्या ट्रिपसाठी इतकं सामान कशाला..??  

जेवण उरकून रात्रीच गाडी पकडण्याचा बेत केला होता. तशी रिसेर्वेशन पण केली होती, 'चार फुल दोन हाल्फ'
विंडो-सीट होती तरी रोजची ती ट्रॅफिक त्या खिडकीतून पाहवत नव्हती,आणि दिवसभराच्या थकव्याने झोपही लागली. यात कसला आलाय प्रवास...!!!

थेट जाग आली ती सकाळीच. डावा हाथ खिडकीवर टाकून झोपल्याने थोडा दुखत होता, छोटा मुलगा वृषभ मांडीवर डोकं ठेऊन शांत निजला होता. आतामात्र खिटकीतून नजर टाकली तर वाह... कोकण सारं इथेच असं भासू लागलं. थंडीचे दिवस असल्याने दाट धुकं पडलं होतं. सगळीकडे हिरवीगार पण थंडीने निस्तब्ध झालेली झाडं जणू मला अभिवादन करून माझं स्वागतच करत होती. काळ्याकुट्ट डांबरी रस्ता आणि त्या रस्त्यावरचा पहाटेचा मंद अंधार दूर सारत आमची बस वेगात चालली होती.

इतक्यातच पुढच्या वळणावर 'फट्ट' असा आवाज येऊन बस रस्त्याच्या कडेला घेतली गेली....!!!

हाहाहा...काय सांगू...!!! अर्थातच बस पंचर झाली होती-आणि मी खूप खुश.!!!

लहानपणी असच गंमत म्हणून वाटायचं कि गावापासून दूर कुठेतरी बस बंद पडावी, आणि आज तर गाव जवळून पाहण्याची संधी माझ्याकडे धावून आली होती. 

बस मधनं खाली उतरल्यावर समोर दूरपर्यंत गेलेला रस्ता जणू 'चल' म्हणत होता. पहाटेचा मंद वारा अंगावर शहारे उठवत होता. धुक्यामुळे फारदूरच काही दिसत नव्हतं. सभोवतीच्या झाडांवर पक्षांचा मधुर किलबिलाट मनाला प्रसन्न करत होता. एकदोन कुत्रीं रस्त्याच्या कडेला अंगाची पुरचुंडी करून झोपली होती. अर्थातच हा थंडीचा परिणाम होता. वातावरण कसं एकदम अल्हाददायक होतं .माझा तर विचार चाललेला कि घरापर्यंत असाच पायी प्रवास करावा...! पण बाकीच्या पण मंडळींचा विचार मनात आला आणि तसेच सोबत बऱ्याचशा बॅग होत्या. आज्जीने तर त्या बॅगेतुन स्वेटर काढून कधीच घातला होता. मी म्हंटलं, "अगं आज्जी सगळ्या जगाची थंडी तुझ्यावरच पडली आहे कि काय...??" यावर ती हसून म्हणाली, "अरे राजा वय झालं आता..!!"

मी आज्जीच्या खांद्यावर  हात टाकून चालत होतो, छोटी मुलं तर जणू झोपेतच चालत होती. मग छोट्या चिऊला आईने कडेवर घेतलं. एव्ह्ड्यातच मागून बैलगाडीचा आवाज आला, मला तर फार आनंद झाला, वाटलं आज कसं सगळं मनासारखं घडतंय. ती बैलगाडी म्हातारे आजोबा चालवत होते. थोडं जवळ आल्यावर विचारलं तर समजलं ते आमच्या इच्छित ठिकाणीच जवळपास कुठेतरी चालले होते. मी मुद्दाम थकल्या सारखा चेहरा करत त्यांना विचारलं,"आजोबा सोडालं काहो आम्हाला तिथंपर्यंत...??" क्षणाचाही विलंब न लावता ते 'चला' असं म्हणाले. कशीतरी जागा करत आम्ही सगळे बैल गाडीत बसलो. छोटी मुलं धरून ६-७ जणांची ती बैलगाडी रस्त्यावरून हळू-हळू चालू लागली. त्या वेळी जेव्हडा आनंद मला होत होता तितका आनंद कधीही न झाल्यासारखं  वाटत होतं. बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावर सपशेल दिसलं असावं, म्हणूनच 'वैदेही' माझ्याकडे चोरट्या नजरेने पहात गालातल्या-गालातच हसत होती. कदाचित म्हणत असावी,"आज बऱ्याच दिवसांनी इतका बालिश झालाय." 

बैलगाडी अगदी संथ गतीने चालत होती आणि मलाही काही घाई नव्हती, बहुतेक त्या आजोबांना पण घाई नसावी...!!! मधेच कुठेतरी दवाचे थेंब अंगावर पडत होते. इकडे आई-वृषभ आणि आज्जीच्या गोष्टी चालल्या होत्या, त्याला शेतं, चिऊताई-खारुताई दाखवत होत्या. मधेच आजोबांचीही बडबड चालू होती जणू ते आमच्यातलेच झाले होते.

मी-चिऊ आणि वैदेही थोडं मागं सरकून बसलो होतो. चिऊला तर कसलाच पत्ता नव्हता बस बंद पडल्यापासून ती झोपलेलीच होती. तेव्हा सुद्धा वैदेहीच्या मांडीवर आरामात झोप काढत होती. मी या सगळ्यांच्याच शेजारी बसलो होतो, मी वैदेहीचा हात माझ्या हातात घेतला आणि तिच्याकडे पाहू लागलो. तसं ती मला पाहून म्हणाली,"आत्ता आठवण झाली का माझी...??" असं म्हणून ती मुद्दाम रूसवेला चेहरा करून दुसरीकडे पाहू लागली. तसा मी तिचा हात आणखी दाबून म्हंटल."कॉलेज चे दिवस आठवतायत का...??" मी आणि वैदेही एकाच कॉलेज मध्ये असताना चौपाटीवर कधीतरी घोडागाडीची केलेली सैर मला आठवली आणि त्या सोबतच्या बऱ्याच गमती-जमती मला आठवल्या. वैदेहीने ते बरोब्बर हेरलं असावं. तिने तोंडावर बोट ठेऊन "शू$$" असा आवाज काढत आई आणि आज्जीकडे पाहिलं. मी जोरात हसायला लागल्यावर या तिघांच्या गप्पा थांबल्या आज्जीने मला विचारलं, "काय झालं रे राजा ...??" मी वैदेही कडे पाहत "काहीच नाही"असं म्हंटल.

हा आमचा प्रवास मी कधीच विसरणार नव्हतो. या सर्व आठवणी नेहमीच माझ्या मनात तशाच ताज्या राहणार होत्या. या सर्वामध्ये रस्ता कधी संपला ते समजलच नाही. समोरून आमचं घर दिसत होतं. त्या आजोबांनी तर आम्हाला पूर्ण घरापर्यंतच सोडलं होतं. आमच्या अगोदरच पोहोचलेली आमची अर्धी मंडळी म्हणजे बाबा, काका, आजोबा आमची हि गंमत समोरूनच पहात होते. बैलगाडीतून उतरल्या वर आज्जीला विचारलं,"कसा होता प्रवास..??"
तशी आज्जी म्हणते कशी,"माझ्या राजा बरोबर प्रवास करायचा म्हणजे सगळ्या गोष्टीत अगोदरच मनाची तैयारी करून ठेवायला हवी...!!!" तशी सगळी मंडळी माझ्याकडे बघून हसायला लागली.



समाप्त.

                                                                                                                     "आभाळसांज"

                                                                                                                -मंगेश मिलिंद हरवंदे

3 comments:

  1. सत्य कथेला काल्पनिकतेचा आधार घेऊन मांडण्याचा प्रयत्न तर नाही ना?
    कारण त्यातल्या भावना Fictional वाटत नाहीत.
    प्रत्येक गोष्टीचे हुबेहूब वर्णन.....

    ReplyDelete
  2. Stories will remains fictional only.. Shreeprasad.
    Thanks for compliment..!!

    ReplyDelete