Monday 6 February 2017

सुटकेचा निश्वास...


सुटकेचा निश्वास... 


जून महिन्याचा चौथा आठवडा असला तरी पावसाने काही हजेरी लावली नव्हती. सुकलेल्या शेतांवर भरपूर उन्हं कोसळत होती. दूरवर मंदिरापर्यंत गेलेल्या त्या रस्त्यावर मृगजळ तळपत होते. डोंगरावरील मंदिराच्या पायऱ्या देखील चांगल्याच तापल्या असाव्यात म्हणून तर इतरवेळी भिक्षा मागत बसलेली सर्व मंडळी कधीच आपापल्या झोपडीत शिरली होती.अंगाची पार लाही-लाही होत होती. उन्हाच्या त्या तडाक्यानं सुकत आलेल्या तळ्यात म्हशी मात्र मनसोक्त नाहत होत्या तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला कुत्रीं जीभा बाहेर काढून धापा टाकत थंडावा घेत होती.

'मृग नक्षत्र  सुरु व्हायचा वेळ आला...तरी पाऊस कुठं गेला..??' अशा विषयांच्या गप्पा मारत काही गावकरी मंडळी वडाच्या पारावर बसून तंबाखू  मळत होतें. समोरच त्या मातीच्या रस्त्या वरून एक आज्जी भाजी विकून नुकतीच घरी चालली होती. इतरवेळी वाटसरूंना सावली देणाऱ्या झाडांची पाने गळत असताना ती झाडे आकाशाकडे केविलवाणी पाहत होती. लहान मुले 'येरे-येरे पावसा' गाणं म्हणत होती. एकंदरीत सारं गाव उन्हाच्या त्या तडाख्याने त्रस्त झालं होतं...

विश्वकर्त्याला मात्र या गावाची दया आली असावी... अचानक ढगांमध्ये काही बदल होऊ लागले, मघाशीपर्यंत प्रखर वाटणारे उन्ह आता क्षीण होत चालले आणि वारा तर मागे वाघ लागल्या सारखा सैरावैरा पळू लागला. सूर्य आता ढगांच्या पडद्याआढ होत चालला होता. थोडाफार अंधार होऊन मधेच कुठेतरी आकाशात वीज चमकत होती. तोच आकाशातून पाण्याचे 'अनमोल मोती' बरसू लागले. तोच तो पाऊस ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता का सारेजण त्या पासून वाचण्यासाठी आसरा दिसेल तिथे पळत होते..??

माघाशीची सर्व धापा टाकणारी कुत्रीं तर रस्त्याच्या कडेलागून असेल्या मंदिरात कधीच शिरली होती आणि पारावर बसलेली ती मंडळी घराकडे पळत होती. ओल्या मातीचा छान सुगंध पसरला होता...

मधेच एकाद वाहन आल्यावर त्यामागे धावत सुटणारी धूळ आता नाहीशी झाली होती. झाडांनी तर सुटकेचा निश्वास सोडला होता, आणि ती भाजी विकून आलेली आज्जी कधीच घरी पोहोचून 'येरे-येरे पावसा' गाणं म्हणणाऱ्या त्या मुलांना होड्या बनवून देत होती...

सारं गाव आता पावसाच्या सुखद-आनंदाश्रूंनी हसू लागलं होतं, आणि 'मी' देखील त्या आंब्याच्या झाडामागून चिंब भिजत हि सारी मजा पहात होतो.

समाप्त.

                                                                                                                 "आभाळसांज"

                                                                                                            -मंगेश मिलिंद हरवंदे


2 comments:

  1. शब्दांचा छान व योग्य वापर,
    समर्पक शिर्षक,
    अर्थपूर्ण कथा...
    Specially ते तंबाखूचे निरीक्षण....

    ReplyDelete
  2. धन्यवाद श्रीप्रसाद...

    ReplyDelete